अश्लील शब्दातील गाणी गाण्यांवर प्रतिबंध, पोलिसांची कडक नियमावली जारी
रमजानचा महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली

मुंबई : दरवर्षी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी या तीनही दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात मजा-मस्ती पाहायला मिळते. मुंबईसह राज्यभरात आता होळी आणि धुलिवंदनाच्या सणाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या १३ मार्च आणि १४ मार्च या दोन्हीही दिवशी होळी आणि धुलिवंदन साजरा केला जाणरा आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. हे आदेश १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५ पर्यंत असणार आहेत.
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून नुकतंचे एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. यात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. यानुसार, अश्लील शब्दातील गाणी गाण्यांवर प्रतिबंध असणार आहे. तसेच अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने मुंबई पोलिसाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील माटे शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
मुंबई पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात काय?
होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी सण १२ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत साजरा केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. मी सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी येथे नमूद केलेल्या काही कृत्यांना प्रतिबंधित करणे आवश्यक मानतो. त्यानुसार, पोलीस उपआयुक्त अकबर पठाण यांनी काही नियमावली जारी केली आहेत.
१. अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे. २. हावभाव किंवा नक्कलचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते. ३. पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे. ४. रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा फेकणे.
उल्लंघन केल्यास शिक्षा काय?
जो कोणी आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत करेल त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाईल. हे आदेश १२ मार्च २०२५ रोजी ००.०१ ते दि. १८ मार्च २०२५ च्या २४.०० वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यास मनाई
तसेच होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यासह एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.