महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ संबोधल्यानं मोठं वादळ
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या देशभरात चर्चेत

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या देशभरात चर्चेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ संबोधल्यानं मोठं वादळ उठलं आहे. शिवसैनिकांकडून तोडफोड आणि धमक्यांनी हा विषय गाजला. तसंच कुणाल कामरानं याप्रकरणी तातडीनं माफी मागावी अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण आता कुणाल कामरानं खरोखरच माफी मागितली आहे.
कुणाल कामराचं हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट झालं आहे. यानंतर आता सरकारनं कुणालच्या शोला हजेरी लावलेल्या प्रेक्षकांना नोटीसा पाठवल्या आहेत. कुणालच्या नया भारत या शोमध्ये हजेरी लावलेल्या एका बँकरला पोलिसांनी नुकतंच साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं. ही नोटीस आल्यानंतर खरंतर एका सुट्टीवर निघालेल्या या बँकरला आपल्या ट्रिपचा कालावधी कमी करावा लागला.
हेही वाचा – महापालिकेस विक्रमी उत्पन्न; ८ हजार २७२ कोटींचा आकडा पार
व्यक्त केली दिलगिरी
ही गोष्ट कानावर आल्यानंतर कुणाल कामरा यानं ट्विट करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं म्हटलं की, माझ्या शो मध्ये सहभागी झाल्यामुळं तुम्हाला ज्या असुविधेला सामोरं जावं लागलं आहे. त्यासाठी मला खूपच खेद वाटतोय. कृपया मला ई-मेल करा, कारण मी भारतातील तुमच्या कुठल्याही आवडत्या ठिकाणी तुमची पुढची ट्रिप शेड्युल करतो. या प्रतिक्रियेत त्यानं आपल्या चाहत्याची खरंतर माफी मागितली आहे.
वादग्रस्त टिप्पणीवर माफी नाहीच
दरम्यान, कुणाल कामरा यानं नया भारत या शोमध्ये ज्या गोष्टींवरुन विविध राजकारणी लोकांवर विडंबनात्मक काव्य केलं आहे. त्याबद्दल माफी न मागण्यावर तो ठाम आहे. कुणालचा हा व्हिडिओ युट्युबवर १२ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.