महाराजांच्या गड किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे हटविणार : देवेंद्र फडणवीस
शिवजन्माचा मुहूर्त हा शिवभक्तांसाठी साडेतीन मुहूर्तापेक्षाही महत्त्वाचा

आपटाळे : ‘महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी स्फूर्ती व तेज शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील मातीमधून मिळते. छत्रपती शिवरायांनी स्वतःकरिता काही केले नाही, त्यांनी संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावले. त्यांचे गड किल्ले हे मंदिरापेक्षा मोठे असून, या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यासाठी राज्यात टास्क फोर्स तयार करण्यात आला असून, महाराजांच्या गड किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेप्रसंगी शिवभक्तांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – मास्टरमाईंड शाळेतील शिक्षकांच्या कामगिरीची ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जागतिक वारसा स्थळांची ‘युनेस्को’च्या माध्यमातून निवड केली जाते. या स्पर्धेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले स्पर्धेत उतरवले आहेत. पुढील आठवड्यात पॅरिस येथे होणाऱ्या ‘युनेस्को’च्या महासभेत या गड किल्ल्यांचे सादरीकरण होणार आहे.’
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वराज्याच्या व जनतेच्या हितासाठी होता. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हे खऱ्या अर्थाने राज्याची दौलत आहे. या गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही.’
शिवजन्माचा मुहूर्त हा शिवभक्तांसाठी साडेतीन मुहूर्तापेक्षाही महत्त्वाचा आहे. मराठी अस्मिता व स्वाभिमानाची ठिणगी पेटविण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण व्हावे, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे.
– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री