पाणी उकळून प्या; मुंबई महापालिकेचे आवाहन
मुंबई – मुंबईत शनिवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले. तसेच या मुसळधार पावसाचा फटका भांडुप जलशुद्धीकरण केंद्रालाही बसला. पावसाचे पाणी साचल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. परिणामी मुंबईतील बहुतांश भागांत रविवारी दिवसभर पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. मग संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करून संध्याकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र आता खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
पावसाच्या तडाख्याने शनिवारी रात्रीपासूनच हवालदिल झालेल्या मुंबईकरांना पाणीपुरवठा खंडित झाल्याने रविवारी आणखी समस्येला सामोरे जावे लागले. पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रात शिरल्याने तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेथील विद्युतपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. परिणामी मुंबईतील बऱ्याच भागांमध्ये रविवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दक्षिण मुंबईसह अनेक भागांत पहाटे पालिकेचे पाणीच न आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच पाणीपुरवठा कधी होणार हेही कळू न शकल्याने अनेक भागांतील नागरिकांना बाटलीबंद पाण्यावर तहान भागवावी लागली.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी काही भागांतील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. परंतु गाळणी यंत्रणेत पावसाचे पाणी शिरले होते, त्यामुळे आता पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




