#CoronaVirus | मुंबई लोकल 7 दिवस बंद ठेवल्यास कोरोना संसर्ग टाळता येईल – पंकजा मुंडे

मुंबई | भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर भाष्य केलं आहे. जर नियोजनबद्धपणे मुंबई बंद ठेवण्यात आली तर त्याचा लाखो लोकांना उपयोग होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर हे नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली तर लोक यासाठी तयारी म्हणून जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर 7 दिवसांसाठी लोकल ट्रेन बंद राहिल्या तर लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल. आवश्यक दुकानं उघडी ठेवता येतील, मात्र शॉपिंग बंद ठेवावी. अशा प्रयत्नांचा नक्कीच उपयोग होईल.”
मी सतत भूमिका मांडतेय बाहेर पडू नका कोरोनापासून वाचवण्यासाठी गर्दी करणारे कार्यक्रम टाळा. त्यात मी आणि माझं कार्यालयही आलंच. आज तर मला बरं वाटत नाही. कृपया ‘ताई भेटायचं’ आहे असं सतत मेसेज करणाऱ्यांना माझी विनंती आहे घरीच थांबा, जीवन मरणाचं कारण असेल तर ठीक. यंत्रणांना काम करू द्या, अशीही भूमिका पंकजा मुंडे यांनी याआधी घेतली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचीही मागणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “अधिवेशन कालावधी कमी केला, सुट्ट्या देणं, घरुन काम हे निर्णय विचारात आहेत. ते योग्य आहेत. मी अशी मागणी सर्वप्रथम जाहीरपणे केली आणि आता मी अंमलबजावणी करणार आहे! मी माझं कार्यालय हे 2 एप्रिलपर्यंत बंद ठेवणार आणि दौरेही रद्द करत आहे. सहकार्य करावे आणि स्वतः या गोष्टी पाळाव्यात ही विनंती.”