मुंबईसह संपूर्ण कोकणात ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – गेल्याकाही दिवासंपासून शांत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शुक्रवारी दिवसभर मुुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आजही मुंबई, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
कोकणासह गोव्यातही येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शुक्रवारी मुंबईत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत 54.78 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली.
पुढील 24 तासांत उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने स्थानिक यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना आणि मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शुक्रवारी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुंबई- पुण्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं 90 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत. पुढचे दोन दिवस पावसाचे असून विदर्भ आणि कोकणात मुसळधार तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.