‘मास्टर लिस्ट’मधील प्रत्येक रहिवाशाची तपासणी!

महाईन्यूज | मुंबई
संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या जुन्या इमारतींमधील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, या हेतूने ‘मास्टर लिस्ट’ अद्ययावत केल्यानंतरही सहमुख्य अधिकाऱ्याने अनधिकृतरीत्या त्यात पाच नावे समाविष्ट केली आहे. या प्रकारामुळे सतर्क झालेल्या मुंबई इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळाने मास्टर लिस्टमधील प्रत्येक रहिवाशाची पुन्हा तपासणी करण्याचे ठरवले आहे. कुठलाही घोटाळा होऊ नये आणि मूळ रहिवाशाला घर मिळावे, यासाठी ही चौकशी सुरू केली जाणार आहे.
सहमुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी केलेला हा प्रकार उघडकीस आत्यानंतर म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी या प्रकाराची दखल घेऊन गोटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्य अधिकारी सतीश लोखंडे यांना दिले आहेत.मास्टर लिस्टमधील ती पाच नावे चुकीने टाकली होती. त्या चुकीची दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी भूमिका गोटे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली होती. त्यामुळे आता मुख्य अधिकाऱ्यांच्या अहवालावर गोटे यांचे भवितव्य अवलंबून आहे. मास्टर लिस्टमध्ये अशा रीतीने नावांचा समावेश करणे योग्य नाही, याकडे म्हाडातील उच्चपदस्थाने लक्ष वेधले आहे.