खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करा, या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात काल सकाळी प्रवाशांनी आंदोलन केले. एसटी बस सेवा पुरेशी नसल्याने नालासोपाऱ्यानंतर विरार येथेही खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला.
उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना एसटी बसमधून मुंबईला जावे लागते. मात्र या बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यातच रस्त्यातील वाहतूक कोंडीमुळे त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे. त्याचा पुन्हा एकदा विरार स्थानकात उद्रेक झाला. सोमवारी विरार बस डेपोमध्ये एसटी बस उशिरा आल्याने शेकडो संतप्त प्रवासी सकाळी दहा वाजता विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले. त्यांनी उपनगरीय रेल्वे सुरू करा, अशी मागणी करत त्यांनी घोषणा दिल्या. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी वसई रेल्वे पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल न केल्याचे पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले. मात्र विरार पोलिस ठाण्यात मुंबई पोलिस अधिनियम कलम ६८ आणि ६९ अंतर्गत कारवाई करत आंदोलकांना समज देऊन सोडण्यात आल्याचे विरार पोलिसांनी सांगितले