आधी फेसबुक पोस्ट, आता ट्विटरवर भाजपचा नामोनिशाण नाही, पंकजा मुंडेंचा पुढचा प्रवास ठरला?

मुंबई | राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. “पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे” असं पंकजा मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
एकीकडे ही फेसबुक पोस्ट तर दुसरीकडे पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजप गायब असं चित्र आहे. पंकजांनी आपल्या ट्विटर हॅण्डलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी पंकजांच्या ट्विटर प्रोफाईलध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता त्यांच्या प्रोफाईलवर भाजपबाबत कोणताही उल्लेख नाही. ट्विटर अकाऊंटच्या कव्हरपेजला जनतेला नमस्कार करणारा पंकजांचा फोटो आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. पंकजा मुंडे येत्या 12 तारखेला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 12 डिसेंबर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस. त्यामुळेच जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर संवाद साधण्यासाठी पंकजांनी कार्यकर्त्यांना साद घातली आहे.