breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

खासदार संजय राऊतांची ‘शिवगर्जना’; आमदार लक्ष्मण जगतापांना ‘सुवर्णसंधी’

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना ५० नगरसेवक निवडून आणेल आणि शिवसेनेचा महापौर होईल, अशी ‘शिवगर्जना’ खासदार संजय राऊत यांनी केली. त्यामुळे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार हे निश्चित झाले आहे. याचा परिणाम, पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर नेत्यांच्या वर्चस्वावर होणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचे तिकीट धोक्यात येणार असून, आमदार जगताप यांना लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटाची सुवर्णसंधी मिळणार आहे.
– अधिक दिवे, मुख्य संपादक, महाईन्यूज.कॉम.

मावळ लोकसभा मतदार संघातील दोन ‘टर्म’ शिवसेनेच्या तिकीटावर संसद गाजवणारे श्रीरंग बारणे यांना २०२४ मध्ये तिकीट मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. यापूर्वीच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी लढवणार, असे सूचित केले आहे. महाविकास आघाडीने महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित लढल्यास मावळातून राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल. गत निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव पवार कुटुंबियांच्या वर्मी लागला आहे. ज्या मतदार संघातून कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला. त्या मतदार संघाला अर्थात मैदानाला पाठ दाखवणे पवारांच्या रक्तात नाही. त्यामुळे पार्थ पवार पुन्हा निवडणूक लढवतील. महाविकास आघाडी एकत्रित लढण्यास पार्थ पवार हा सामना ‘सरळ सेट’मध्ये जिंकतील. कारण, शेतकरी कामगार पक्षही सध्या महाविकास आघाडीसोबत आहे.
याउलट, खासदार श्रीरंग बारणे यांना शिवसेना पक्षाने दोनवेळा तिकीट दिले आहे. शिवसेनेच्या तिकीटवाटपाचा आजवरचा अनुभव पाहता दोनदा तिकीट दिले की, त्याठिकाणी दुसऱ्या चेहऱ्याला संधी दिली जाते, असे शिवसैनिक सांगतात. महाविकास आघाडी धर्माचे पालन करीत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मावळची जागा राष्ट्रवादीला सोडतील. त्यामुळे बारणे यांना एकतर शिवसेनेत नेतेपद घेवून शांत रहावे लागेल किंवा भाजपाकडे तिकीटासाठी चाचपणी करावी लागणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लोकसभा निवडणूक लढवल्यास भाजपा एकाकी पडणार आहे. मावळ मतदार संघामध्ये शिवसेना आणि भाजपाची ताकद तुल्यबळ आहे. पण, भाजपाला महाविकास आघाडीविरोधात पिंपरी-चिंचवडमधून तुल्यबळ ताकदीचा उमेदवार द्यावा लागेल. सध्यस्थितीला भाजपाकडे लक्ष्मण जगताप यांच्या तोडीचा नेता नाही. “पिंपरी-चिंचवडकरांनी संधी दिल्यास मला संसद गाजवायला आवडेल” अशी राजकीय महत्त्वाकांक्षा जगताप यांनी मध्यंतरी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जगताप यांनी आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे.
मावळ लोकसभेत भाजपा तुल्यबळ…
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी ‘शेकाप’च्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी जगताप २०२४ मध्ये मोठी ताकद लावतील, अशी चिन्हे आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी अशा सहा विधानसभज्ञ मतदार संघाचा समावेश आहे. यापैकी पनवेल, उरण आणि चिंचवडमध्ये म्हणजे ३ मतदार संघामध्ये भाजपाचे आमदार आहेत. उर्वरित ३ पैकी मावळ आणि पिंपरीमध्ये राष्ट्रवादी आणि कर्जतमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तुल्यबळ ताकद भाजपाची आहे, असे चित्र आहे. त्याचा फायदा जगताप यांना तिकीट मिळाल्यास निश्चितपणे होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button