breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती म्हणणाऱ्या कंगनावर खासदार संजय राऊत संतापले; म्हणाले, “काही लाज, लज्जा….”

मुंबई |

भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यावरुन संताप व्यक्त केला असून तिला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घेण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. तसंच भाजपाध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर मत मांडलं पाहिजे असंही म्हटलं आहे.

“फासावर गेलेल्या सर्व क्रांतीकारकांनी काय भीक मागून स्वातंत्र्य मिळवलं? भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, पंतप्रधानांनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी नाराजी जाहीर केली आहे. पुढे ते म्हणाले की, “अनेक स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आलं आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपाला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल.

कंगनाला जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत ते सगळे परत घेतले पाहिजेत. अन्यथा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा हक्क आता भाजपाला राहिलेला नाही”. “कंगनाला तरी काही लाज लज्जा…माफी तरी मागावी. ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर हा सगळा सोहळा झाला तिथे सर्वांनी टाळ्या वाजवल्या हा निर्लज्जपणाचा कळस आहे,” अशीही टीका संजय राऊतांनी केली. ‘‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने एका कार्यक्रमात उधळली. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली असून, तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले.

  • सलमान खुर्शीद यांच्यावरही टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात, सद्य:स्थितीतील हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या दहशवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केल्यामुळे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. संजय राऊत यांनी त्यांच्यावरही टीका केली असून तेदेखील कंगना आहेत असा टोला लगावला. “त्या पुरुष वेषातील कंगना आहेत. अशा प्रकारची वक्तव्यं करुन काँग्रेस पक्षातील काही जुने जाणते म्हणवणारे काँग्रेस आणि राहुल गांधींना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते विद्वान आहेत, पुस्तकं लिहितात, एखादी ओळ हिंदुत्वावर टाकतात आणि वाद निर्माण करुन आपल्या पोळ्या भाजतात. हिंदू धर्माला टआयसिस’ व ‘बोको हराम’ उपमा देणं हेसुद्धा कंगनाने केलेल्या देशाच्या अपमानासारखाच आहे”.

“हिंदुत्वानं काय केलं आहे? काही लोक चुकीचे वागले असतील. जसं इस्लाम आणि इतर धर्मात आहे….म्हणून त्याचं खापर संपूर्ण हिंदुत्वावर फोडणं ही मुर्खांची लक्षणं आहेत. आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो. काँग्रेसदेखील यावर भूमिका स्पष्ट करेल याची खात्री आहे. हे व्यक्तिगत मत असलं तरी ते काँग्रेसचे नेते आहेत. पक्ष अडचणीत यावा यासाठी अशी विधानं केली जात आहेत का हे पहावं लागेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी घरचे नोकर असल्यासारखे

“आम्ही सगळ्यांना अंगावर घ्यायला तयार आहोत. भाजपा केंद्रीय यंत्रणांचा वापर करत महाविकास आघाडीचे नेते, मंत्रालयं, नातेवाईक यांना त्रास देत असून आम्ही घाबरत नाही. नवाब मलिकांचं कौतुक उद्धव ठाकरेंनी केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. का कपट आणि नीचपणाचा कळस महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष करत असून हे अंगलट आल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.

“ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी हे तुमच्या घरचे नोकर असल्यासारखं काम करत आहोत. या आमच्याकडे, आम्ही तयार आहोत. पण हे शस्त्र २०२४ नंतर तुमच्यावर उलटेल. जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात. एक दिवस तलवारीची मूठ आमच्याकडे येईल तेव्हा तोंड लपवायला जागा राहणार नाही. तुम्ही कितीही कारस्थान केली तरी तपास यंत्रणानी यांचं मोहरे होऊ नये,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

  • कंगनाविरोधात पोलिसांत तक्रार

कंगना राणावतविरोधात कलम ५०४, ५०५ आणि १२४ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

  • राजकीय वर्तुळात पडसाद

भाजप खासदार वरूण गांधी यांनी कंगनाला ट्विटद्वारे लक्ष्य केले. ‘‘कधी महात्मा गांधींच्या त्यागाचा अवमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर आणि आता मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह लाखो स्वातंत्र्यसैनिकांबद्दल तिरस्कार. अशा विचाराला मुर्खपणा म्हणावा की देशद्रोह’’ असे ट्विट वरूण गांधी यांनी केले.

कंगना रणौतला अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली. कंगनाचे विधान हा थेट देशद्रोह ठरतो, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले. ‘अपात्र व्यक्तींना पद्मपुरस्कार दिल्याने असे होते. कंगनाने संपूर्ण देशवासीयांची माफी मागावी. सरकारने तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा’, अशी मागणीही गौरव वल्लभ यांनी केली. कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनीही कंगनावर टीका केली. समाजमाध्यमांवरही कंगनाविरोधात तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कंगनाची तुलना भाजप युवा मोर्चाची कार्यकर्ती रूची पाठक हिच्याशी केली. भारताला ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर स्वातंत्र्य मिळाल्याचे विधान करून रूची पाठक हिने अलिकडेच वादंग निर्माण केला होता. कंगना या नव्या रूची पाठक आहेत, अशी टीका प्रियंका यांनी केली. कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर टाळ्या वाजवणारे ते मुर्ख कोण आहेत, हे मला जाणून घ्यायचे आहे, असे अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ट्विटरवरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button