ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माता न तू वैरिणी; बंद हॉटेलच्या खुर्चीवर नवजात अर्भकला सोडून आई झाली पसार

जालना | जालना ते अंबड रोडवर लालवाडी येथील संतोष आसाराम चव्हाण हे शनिवारी सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना पारनेर शिवारात असलेल्या बंद सावता हॉटेलमधून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका खुर्चीवर कापडामध्ये गुंडाळून ठेवलेलं पुरुष जातीचे नवजात अर्भक रडत असल्याचे दिसले. त्यांनी हॉटेलमालक दामोधर खरे यांना झोपेतून उठवून माहिती दिली. त्या दोघांनी परिसरात काहीकाळ या अर्भकाच्या नातेवाईकाचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत.

अंबड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन पतंगे यांना मोबाईलवरून याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अर्भकास जालना येथे जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत भादंवि. ३१७ कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाळाच्या नाळेला टॅग लावलेला असून उजव्या पायाच्या पंजाचा ठसा घेतल्याची शाईची निशाणी आहे. त्यामुळे त्याचा जन्म एखाद्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या बाळाला शासकीय बालकल्याण समितीकडे देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ‘ताई तुझ्या बाळाला तुझी गरज आहे. एक लेकरू त्याच्या आईच्या दुधासाठी रडत आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. या बाळाला त्याच्या आईची भेट करून देण्यासाठी मदत करा’, असे आवाहन अंबड येथील सामाजिक कार्यकर्ते समाजभानचे दादासाहेब थेटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button