व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यास 15 वर्षीय मुलीवर आईची बळजबरी; आईसह दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड | एका 35 वर्षीय व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यासाठी आईने तिच्या 15 वर्षीय मुलीला धमकी दिली. तसेच 35 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आईसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत चाकण परिसरात घडला.याप्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालमिया अली (वय 35) आणि पीडित मुलीच्या आईच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354. 354 अ (1) (एक), 323, 324, 506 (2), 109, 114, 34, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12, 17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अली याने पीडित तरुणीला लग्न करण्याची मागणी घातली. लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने पीडित मुलीसोबत अश्लील गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आरोपीला पीडित मुलीने विरोध केला असता त्याने लोखंडी सळई आणि झाडूने मुलीच्या मांडीवर, पायावर, पाठीवर मारहाण केली.
पीडित मुलीची आरोपी आई हिने आरोपी अली याच्यासोबत फिर्यादीने शारीरिक संबंध न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अली याला आरोपी आईने पीडित मुलीसोबत बिनधास्त शारीरिक संबंध ठेव, असे म्हणून प्रोत्साहन दिले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी लालमिया अली याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.