breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

एसटी हिंसाचारप्रकरणी पन्नासपेक्षा अधिक गुन्हे दाखल

मुंबई |

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले असून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त गुन्हे एसटी प्रशासनाने नोंदविले आहेत. यात ३१ गुन्हे एसटीवर दगडफेक केल्याप्रकरणी असून एका प्रकरणातील गुन्हेगार हा महामंडळाचा वाहक असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक हजार १०८ गाडय़ा धावल्या, तर १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर रुजू झाले.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केल्यानंतर राज्यातील एसटीची वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे. आगारातून सुटणाऱ्या गाडय़ा काही अंतरावर जाताच कर्मचाऱ्यांनी आजही दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात महामंडळाने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, महामंडळाने निलंबनाची कारवाईही अधिक तीव्र केली असून रविवापर्यंत सहा हजार ४९७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. रोजंदारीवरील एक हजार ५२५ जणांची सेवा समाप्त केली आहे. कामावर हजर न झाल्यास कारवाई तीव्र करण्याचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपैकी ९३ जणांना रविवारी निलंबित केले.

  • दगडफेक करणारा वाहक ताब्यात

जळगाव आगारातील पहिली एसटी जामनेरला रवाना झाली होती. जामनेर येथून दुपारी २ वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरीजवळील गाडेगाव घाटात लपून बसलेल्या उमेश आवटी याने एसटीच्या काचेवर दगड भिरकावला. चालक सोपान सपकाळे यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने पुढील काच थोडक्यात बचावली.

  • कोन येथे बसवर दगडफेक

कल्याण: कल्याण-भिवंडी रस्त्यावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर शनिवारी रात्री अनोळखी व्यक्तीने दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. कोन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून कल्याण बस आगारातील एका चालकाला ताब्यात घेतले आहे. मागील अनेक दिवसांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दोन दिवसांपासून अनेक एस. टी. कर्मचारी कामावर हजर होऊन बस आगारातून काढून प्रवासी वाहतूक करत आहेत. शनिवारी रात्री कल्याण आगाराची बस कोन येथून भिवंडी येथे चालली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने बसवर दगडफेक केली. बसच्या काचा फुटल्या. कल्याण आगाराचे व्यवस्थापक विजय गायकवाड यांच्या सूचनेवरून चालकाने कोन गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून चालक विठ्ठल खेडकरला ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button