पिंपरी l प्रतिनिधी
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि नानासाहेब शंकर गायकवाड या पिता पुत्राच्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाद्वारे (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी आदेश दिले आहेत.
टोळी प्रमुख गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय 36, रा. औंध, पुणे), संदीप गोविंद वाळके, सचिन गोविंद वाळके, राजू दादा अंकुश, नानासाहेब शंकर गायकवाड, अॅड. चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर अशी कारवाई झालेल्या टोळीची नावे आहेत.
आरोपींच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे असे एकूण 14 गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या टोळीविरोधात मोकाची कारवाई करण्यात आली आहे.