TOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव : नाना पटोले यांचे भाकीत

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल. त्यानंतर देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता येईल, असे भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तविले आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी सकाळी यासंदर्भात ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. नाना पटोले यांनी नेमके आताच अशाप्रकारेच ट्विट का केले? कोणत्या आधारावर नाना पटोले यांनी २०२४ मध्ये भाजपला पराभूत करण्याचा दावा केला आहे, असे अनेक प्रश्न या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची अक्षरश: धुळधाण उडाली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक स्तरावर चर्चा आणि आत्मपरीक्षण सुरु आहे. आगामी काळात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर पक्षाचे नेतृत्त्व गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे द्या, असा सूर काही नेत्यांनी लावला आहे. त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी तशी तयारीही दाखवली होती. त्यामुळे आगामी काळात संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होऊ शकते. ही निवडणूक साधारण जून किंवा जुलै महिन्यात होईल. मात्र, नाना पटोले यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व राहुल गांधी यांच्याकडेच राहील, असे संकेत दिले आहेत. तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, हेदेखील स्पष्ट होते आहे. यावर आता काँग्रेसमधील नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
या वर्षाअखेर होऊ घातलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी संघटना स्तरावर तशी चर्चा सुरु आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुजरातमधील नेत्यांशी याबाबत चर्चा केल्याचे समजते. तसेच प्रशांत किशोर यांच्याशी काँग्रेसची मागच्या दाराने चर्चा सुरु आहे. काँग्रेसने निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रे दिल्यास उमेदवार निश्चित करण्याचा अधिकारही आपल्याला मिळायला हवा, असा प्रशांत किशोर यांचा आग्रह होता. मात्र, काँग्रेसमधून या प्रस्तावाला विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची की नाही, याबाबत अद्याप काँग्रेस पक्षात एकमत नाही.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button