पिंपरी / चिंचवड

तळवडेत मोबाईल तर वाकडमध्ये मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी l प्रतिनिधी

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवडे येथे एका पादचारी महिलेच्या हातातील मोबाईल फोन दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावला. तर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनोदेवस्ती वाकड येथे पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 26) चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथील स्नेहा पोलीमर्स कंपनीसमोरील रस्त्याने जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना विनोदेवस्ती, वाकड येथे शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी पावणे आठ वाजता घडली. एका महिलेने दुचाकीवरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण विनोदे वस्ती येथून पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 60 हजारांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button