breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोर मनसेची पोस्टरबाजी

मुंबई – मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर या रस्त्याचे रुंदीकरण झाले तर परिसरातील वाहतूक कोंडी आणि लोकांचा त्रासदेखील कमी होईल. यासाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मुंबई महानगरपालिकाने जर या रस्ता रुंदीकरणासाठी महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात मनसे मुंबई महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराच मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी दिला आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग जात आहे. त्यामुळे प्रतीक्षा बंगल्यासमोर मनसेकडून पोस्टरबाजीही करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई महापालिकेला सहकार्य करावे, असे मनसेने पोस्टरच्या माध्यमातून म्हटले आहे.

संत ज्ञानेश्वर मार्गाच्या रुंदीकरणासाठी 2017मध्ये मुंबई महानगरपालिकेने मार्गाच्या आजूबाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवली होती. बहुतांश भूखंड मालकांनी या नोटिशीला प्रतिसाद दिला. मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर आता या मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाल्यामुळे मनसेने प्रतीक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लावले आहेत. बिग ‘बी’ आपला ‘बिग हार्ट’ दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच ‘प्रतीक्षा’, अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, असे या पोस्टरवर लिहिले आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने प्रतीक्षा बंगल्याच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींवर तीन वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, आमच्या इमारतीबाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली. तसेच या लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसापासून मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरच्या रस्त्यावर रोड मॅपिंग तसेच मार्किंग करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button