breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिखली-नेवाळे वस्तीतील बंडखोरीवर आमदार महेश लांडगेंचा ‘यॉर्कर’

  • कट्टर समर्थक निलेश नेवाळे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
  • नाराज नगरसेवक संजय नेवाळे यांना अखेर ‘चेकमेट’

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या नगरसेवक संजय नेवाळे यांच्यापेक्षा तगडा जनसंपर्क आणि प्रभावी चेहरा असलेला उमेदवार भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी चिखली-नेवाळेवस्तीमधून ‘लॉन्च’केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या नेवाळे यांना ‘राजकीय चेकमेट’ मिळाला आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर नगरसेवक संजय नेवाळे यांना क्रीडा समिती सभापतीपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आणखी मोठ्या पदाची अपेक्षा असल्याने नेवाळे भाजपा आणि पर्यायाने आमदार लांडगे यांच्यावर नाराज आहेत, असे बोलले जात होते. दरम्यान, नेवाळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात माजी आमदार विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली. तसेच, संजय नेवाळे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत वेळ आल्यावर निर्णय घेवू, अशी जाहीर कबुली दिली होती. त्यामुळे चिखली- नेवाळेवस्तीमध्ये भाजपाचा चेहरा कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
महापालिका निवडणुकीची गणित लक्षात घेवून उद्योजक निलेश नेवाळे यांना भाजपाने ताकद दिली आहे. निलेश हे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे, पूर्वाश्रमीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले नेवाळे सध्यस्थितीला चिखली-नेवाळेवस्तीतील जनाधार असलेले व्यक्तीमत्व आहे.
हवेली पंचायत समितीचे सभापती आणि चिखली गावचे १० वर्षे सरपंचपद भूषवलेले ज्येष्ठ नेते मधुकर नेवाळे हे निलेश नेवाळे यांचे वडील आहेत. बांधकाम व्यावसायात मोठे प्रस्त असलेल्या नेवाळे यांनी झोपडपट्टी पुन:विकास योजनेंतर्गत चिखली आणि परिसरात सुमारे १ हजार २०० सर्वसामान्य कुटुंबांना घर उपलब्ध करुन देणारे महत्त्वाकांक्षी दोन प्रकल्प सुरू केले आहेत.
इतिहास काय सांगतो..?
२००४ साली माजी आमदार विलास लांडे ज्यावेळी हवेली मतदार संघातून निवडणुकीसाठी मैदानात उतरले. त्यावेळी गजानन बाबर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरोधता भोसरी आणि परिसरातील गावकी-भावकी एकवटली होती. स्थानिकांचा चेहरा आमदार झाला पाहिजे, अशा जिद्दीने काम केले. चिखली-चऱ्होलीसह समाविष्ट गावांतील प्रमुख चेहरे होते. त्यामध्ये नगरसेवक स्व. दत्ता साने आणि नगरसेवक संजय नेवाळे आघाडीवर होते. २००७ च्या महापालिका निवडणुकीत स्व. दत्ता साने यांना संधी मिळाली. २००७ पासून सलग तीनदा साने नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु, माजी आमदार विलास लांडे यांनी अन्याय केल्याची भावना साने व नेवाळे यांच्यामनामध्ये होती. २००९ साली माजी आमदार विलास लांडे अपक्ष निवडणूक जिंकले. त्यावेळीही संधी देण्याचे आश्वासन देवून नेवाळेंना तिकीट मिळाले नाही. साने यांना महत्वाचे पदही मिळाले नाही. परिणामी, २०१४ साली आमदार महेश लांडगे यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ब्रम्हा-विष्णू- महेश कबड्डी संघाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येवून २०१३ मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवल्या होत्या. त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी तत्कालीन आमदार विलास लांडे यांना वगळता जिल्ह्यातील सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. त्यावेळीच २०१४ मध्ये राजकीय भाकरी फिरणार असे संकेत मिळाले होते. २०१४ च्या निवडणुकीत दत्ता साने आणि संजय नेवाळे यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. महेश लांडगे आमदार झाल्यानंतर समाविष्ट गावांतील विकासकामांना चालना मिळाली. शहराच्या राजकारणातील मॅन ऑफ कमिंटमेंट असेल्या लांडगे यांनी २०१७ मध्ये संजय नेवाळे यांना महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. वाईट काळात सोबत राहिलेल्या लोकांना माझ्या चांगल्या काळात निश्चितपणाने संधी देणार, असा निर्धार केलेल्या लांडगे यांनी महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर क्रीडा समिती सभापतीपदी संजय नेवाळे यांना संधी दिली. मात्र, राजकीय महत्त्वाकांक्षा असल्यामुळे नेवाळे यांनी काही मिळाले नाही, असा आक्षेप करीत भाजपा आणि लांडगे यांच्यावर नाराजी दर्शवली. त्यानंतर वाढदिवसानिमित्त जोरदार ब्रँडिंग करीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
…असा झाला निलेश नेवाळेंच्या नेतृत्त्वाचा उदय !
आमदार लांडगे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक केले. महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर नगरसेवकाला महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. १२ वर्षे नगरसेवक असतानाही एखाद्या पदसाठी नेत्यांचे उंबरे झिझवावे लागतात, अशी सल आमदार लांडगे यांना होती. स्थायी समिती सभापती, महापौद पदासाठी दोन-दोनला हुलकावणी मिळाल्याचा अनुभव होता. त्यामुळेच आपल्यासोबत असलेल्या नगरसेकांना प्राधान्याने महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावण्यासाठी आणि तिकीटासाठी संधी लांडगे यांनी कायम प्रयत्न केला. २०१६ मध्ये भोसरी मतदार संघातील ४८ उमेदवार फायनल करुन महेश लांडगे यांनी निवडणुकीच्या सहामहिन्यांपूर्वीच तयारी आणि प्रचार सुरू केला. तिकीट फायनल केलेल्यांमध्ये संजय नेवाळे आघाडीवर होते. पण, भाजपाअंतर्गत त्या जागेसाठी दबाव होता. त्यावेळी ‘संजय नेवाळे यांना संधी मिळाली नाही, तर ४८ उमेदवार लढणार नाहीत’ अशी आक्रमक भूमिका त्यावेळी आमदार लांडगे यांनी घेतली होती. त्यामुळे विरोध असतानाही संजय नेवाळे यांना तिकीट मिळाले आणि नगरसेवकपदाची संधी मिळाली. त्यानंतर क्रीडा समिती सभापतीपदही मिळाले. पण, राजकीय महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्यांना मोठ्या पदाची अपेक्षा होती. मात्र, आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक बनवणे आणि नगरसेवकांना पदाधिकारी बनवणे हे सूत्र आमदार लांडगे यांनी ठेवले होते. त्यामुळे स्थायी समिती सभापती किंवा महापौर अशा पदांवर संधी मिळाणार नाही, ही बाब लांडगे विरोधकांना माहिती होती. त्यामुळे संजय नेवाळे यांच्या मनामध्ये गैरसमज भरवण्यात आला. त्याचा प्रत्यय म्हणून संजय नेवाळे यांनी वाढदिवसाला बॅनरबाजी केली. त्यावर ‘लक्ष विधानसभा’असा संदेश देण्यात आला. संजय नेवाळे राष्ट्रवादीत जाणार अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी जाणार आहे, अशी भूमिका प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केली. त्यानंतर आमदार लांडगे यांनी उद्योजक निलेश नेवाळे यांच्यासारखा ‘कार्पोरेट’ चेहरा समोर आणला. स्थानिक आणि बाहेरच्या लोकांना धरुन असलेला सुशिक्षित उमेदवार देण्याच्या दृष्टीने चाचपणी केली. निलेश नेवाळे यांनी वाढदिवसानिमित्त तुफान शक्तीप्रदर्शन केले. त्या कार्यक्रमांना चिखली गावातील सर्वपक्षीय नगरसेवक, शेजारील प्रभागाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. चिखली- नेवाळेवस्तीमध्ये मराठा आणि माळी समाजासह बौद्ध समाजाचे प्राबल्य आहे. या सर्वस्तरातील लोकांना सोबत घेवून निलेश नेवाळे यांनी कार्यक्रमांचा धुरळा उडवून दिला. निलेश नेवाळे यांनी ज्यापद्धतीने वातावरण निर्मिती केली. ते पाहता आमदार लांडगे यांनी निलेश नेवाळे यांचा चेहरा बाहेर काढला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संजय नेवाळे यांच्याविरोधात निलेश नेवाळे यांचा उदय झाला आणि महेश लांडगे यांच्या ‘यॉर्कर’मुळे संजय नेवाळे यांना ‘चेकमेट’मिळाला, अशी चर्चा चिखली-नेवाळेवस्ती परिसरात रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button