breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

आमदार दिलीप मोहिते-पाटलांना खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ‘चेकमेट’

  • पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची ‘वारी’ थांबवणार का खेड तालुक्यातील वादाची ‘बारी’?
  • अमोल कोल्हे म्हणतात… दिलीप मोहितेंचा सल्ला माझ्यासाठी वडिलकीचा

पुणे । विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील जोडीतील वादाची ठिणगी आणखी भडकणार की विझणार? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

खेड तालुक्यात जनसंपर्क कार्यालय सुरू केले आणि त्याच्या उद्घाटनाला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याहस्ते घडवून आणले. त्यामुळे ‘‘खेडमध्ये जनसंपर्क वाढवा…’’ खोचक सल्ला देणाऱ्या आमदार दिलीप मोहिते यांना खासदार अमोल कोल्हे यांनी ‘चेकमेट’ केले आहे, असा दावा डॉ. कोल्हे समर्थकांमधून केला जात आहे.

पुणे जिल्हा बॅंक निवडणूक प्रचारादरम्यान आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार अमोल कोल्हे यांना थेट लक्ष्य केले होते. ‘‘कोल्हे हे आमच्यामुळे निवडून आले आहेत. केवळ अभिनेता म्हणून ते खासदार झालेले नाहीत. त्यांचा मतदारांशी संपर्क नाही..’’ अशी जहरी टीका मोहिते यांनी जाहीरपणे केली होती. त्यामुळे कोल्हे- मोहिते वाद पेटणार अशी शक्यता होती.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मोहितेंची टीका मनावर घेतली आणि आपली रणनिती बदलली. खेड तालुक्यात तात्काळ जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या अनावरणासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पाचारण करण्यात आले. पवारांनीही त्याला होकार दिला. पण, कोल्हे-मोहीते वाद यामुळे थाबणार आहे का? असा खरा प्रश्न आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासदांच्या मेळाव्यात मोहीते यांनी खासदार कोल्हे यांच्यावर टीका केली. यानंतर अवघ्या १५ दिवसांत कोल्हे यांनी कृतीतून संदेश दिला. टीकेला थेट प्रत्त्यूत्तर न देता जनसंपर्क कार्यालय सुरू करुन एकप्रकारे आमदार मोहीते यांना ‘चेकमेट’ करण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवारांचा कोल्हेंना ‘सॉफ्ट कॉर्नर’…
लोकसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण निवडून दिले. ते अमोल कोल्हे गेली काही महिने मी संसदेची माहिती घेतो, त्यावेळी या तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम डॉ. अमोल कोल्हे करतात. खूप वेळेला मतदार संघात आपला प्रतिनिधी दिल्लीत काय करतो? याची माहिती नसते. खासदार झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा जास्त असतात. मात्र खासदाराकडून , आमदाराकडून , अगदी पंचायत संमिती, ग्रामपंचायत सदस्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात? याच तारतम्य बाळगण्याची अपेक्षा असते, असे म्हणत शरद पवारांनी खासदार कोल्हेची बाजू घेतली. तसेच, आमदार दिलीप मोहिते यांनी घेतलेल्या आक्षेपांना उडवून लावले. पवारांनी घेतलेल्या सॉफ्ट कॉर्नरमुळे दिलीप मोहिते व समर्थकांची नाराजी वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button