breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन-२०२२ : ‘जाणता राजा’च्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी एकवटली!

  • आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार बॅनरबाजी
  • महापालिका निवडणूक रणसंग्रामाचा शंखनाद होणार

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ‘जाणता राजा’ अशी ओळख असलेले पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. पवार ज्या मार्गाने शहरात प्रवेश करणार आहेत. त्या मार्गावरील प्रमुख चौकांत स्वागत कमानींसह मोठे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. पवार यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील राष्ट्रवादी गट-तट विसरुन एकवटल्याचे चित्र दिसत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार पिंपरी-चिंचवडचा दोन दिवस (शनिवार व रविवार) दौरा करणार आहेत. यादरम्यान आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यासाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, पक्षाचे कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी अशी संपूर्ण टीम एकोप्याने कामाला लागली आहे.

पवार यांच्या दौऱ्यानिमित्त दोन दिवसांपूर्वी सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये दौऱ्यातील कार्यक्रमांची रुपरेषा मांडण्यात आली होती. आज शनिवारी खासगी कार्यक्रम उरकल्यानंतर पहिल्यांदा पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू केलेल्या विविध शासकीय योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दरम्यान, शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली असून, दुपारी ३ वाजल्यापासून आढावा बैठक आणि पत्रकार परिषद होणार आहे, असे प्रवक्ते फझल शेख यांनी म्हटले आहे.

महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्याचा निर्धार : शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील

शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यासाठी आजचा दिवस अत्यंत प्रेरणादायी राहणार आहे. देशाचे नेते आणि संपूर्ण तरुणांचे आदर्श असलेले आमचे नेते आज शहरात येत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन तर होईलच. पण, आगामी निवडणुकीत भाजपाविरोधात रान पेटवायला मोठी ताकद मिळणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आज पवार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा मिळणार : आमदार बनसोडे

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांचे या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अनन्यसाधारण योगदान आहे. पवार साहेबांच्या विचारांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहराचा विकासाचा झपाटा कायम ठेवला होता. शहरात साहेब येत आहेत, ही बाब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी आहे.

चिंचवड मतदार संघात नाना काटे यांचे जोरदार ‘ब्रँडिंग’

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांच्या स्वागतासाठी जोरदार ‘ब्रँडिग’ केले आहे.  चिंचवड विधानसभा मतदार संघातील काटे यांच्या पिंपळे सौदागर प्रभागातून पवार यांचा शहरात प्रवेश होणार आहे. त्या मार्गावरील बहुतेक सर्वच होर्डिंगवर काटे यांनी स्वागत संदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना काटे यांनी चिंचवडमध्ये जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे. भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीने मुसंडी मारण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button