breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

मिशन-२०२२  : ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरेंचा पुण्यासाठी ‘राज संवाद’; पिंपरी-चिंचवडसाठी कार्यालय उद्घाटनाचा ‘मुहूर्त’!

पिंपरी । अधिक दिवे

आगामी महापालिका (२०२२) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्याचे नियोजन केले आहे. दि.१९ ते २१ जुलै असे तीन दिवस राज पुण्यात येत आहेत. यादरम्यान, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. मात्र, राज पुण्यात येत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही मनसे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय उभारणार आहे. त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्यानिमित्ताने राज ठाकरे पिंपरी-चिंचवडचा दौरा करतील, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

मनसेचे पुण्याचे अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी नुकतेच पक्षाचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरू केले. कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता पुन्हा ‘राज संवाद’ च्या निमित्ताने पुणे दौरा करणार आहेत. सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.

दोन दिवसात शहरातील चारही भागात बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्या दरम्यान प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार असल्याने, पुढील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे जात आहे. तर दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी करोना काळात ज्या संस्थांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याशी विशेष संवाद साधणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली.

दरम्यान, राज ठाकरे यांचा पुण्यातील संघटनात्म्क बांधणीवर विशेष भर आहे. पण, पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहराध्यक्ष सचिन चिखले काय म्हणतात..?

याबाबत बोलताना मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडलाही पक्षाचे प्रशस्त मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय उभारण्यात येणार आहे. आगामी १५ ते २० दिवसांत कार्यालयाचे कामकाज पूर्ण होईल. त्याचे लोकार्पण करण्यासाठी राज ठाकरे पिंपरी-चिंचवडमध्ये येतील. त्यावेळी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील राजकीय स्थितीचा आढावा राज साहेबांना दिला जातो. पुण्यातील बैठकांनाही पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांना बोलावले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button