breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन-२०२२ : प्रभाग समिती निवडणुकीत सत्ताधारी भाजपाची पकड मजबूत!

  • फ- क्षेत्रीय प्रभाग समिती अध्यक्षपदी कुंदन गायकवाड बिनविरोध

  • भाजपा नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी अखेर घेतला अर्ज माघारी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीची बिगुल वाजले असतानाच फ- प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ‘फिल्डिंग’लावली. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण ढवळून निघाणार अशी शक्यता होती. मात्र, प्रसंगावधान राखत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग समिती अध्यक्षपदी नगरसेवक कुंदन गायकवाड यांची बिनविरोध निवड करुन घेतल्यामुळे शहरात भाजपाची पकड पुन्हा एकदा मजबूत झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सात प्रभागाच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली. केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. परंतु, ‘फ’ प्रभागात भाजपा नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी बंडखोरी केली होती.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग अध्यक्षांचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो. कोरोनामुळे अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अध्यक्षपदासाठी शुकवारी निवडणूक झाली. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध झाली.

…असे आहेत प्रभाग समिती नवनिर्वाचित अध्यक्ष !

सत्ताधारी भाजपाकडून  ‘अ’ प्रभाग अध्यक्ष पदासाठी शैलेश मोरे, ‘ब’ सुरेश भोईर, ‘क’ राजेंद्र लांडगे, ‘ड’ सागर अंगोळकर, ‘इ’ विकास डोळस, ‘ग’ अभिषेक बारणे, ‘ह’ अंबरनाथ कांबळे यांचे एकमेव अर्ज आले होते. अर्ज बाद होऊ नये यासाठी या सर्वांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यांच्या निवडीवर शुक्रवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. तर, ‘फ’ प्रभागात भाजपामध्ये बंडखोरी झाली होती. पण, ऐनवेळी आमदार महेश लांडगे यांनी निवडणुकीत लक्ष घातले आणि आश्विनी बोबडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यश मिळाले आणि कुंदन गायकवाड यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

अजित गव्हाणे यांची रणनिती फेल?

अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष कुंदन गायकवाड आणि अश्विनी बोबडे या दोघांचे अर्ज आले होते. विशेष म्हणजे, बोबडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून कमल घोलप तर अनुमोदक संजय नेवाळे यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे दोघांपैकी कोण अर्ज मागे घेणार की निवडणूक होणार ? अशी चर्चा रंगली होती. वास्तविक, भोसरी विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे गव्हाणे यांनी नाराजांची मोट बांधून फ-प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला होता, असा राजकीय कयास बांधला जात आहे. दुसरीकडे, माजी आमदार विलास लांडे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले नाही. अजित गव्हाणे यांचा अनुभव कमी पडला. प्रभाग समितीमध्ये एकूण १६ सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे ५, मनसे १, भाजपा ८ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे. तसेच, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे निधन झाले आहे. निवडणुकीत भाजपा नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी बंडखोरी केली. त्यांच्या उमेदवारीला सूचक भाजपाचे नाराज नगरसेवक संजय नेवाळे आणि अनुमोदक भाजपाच्याच नगरसेविका कमल घोलप आहेत. याचा अर्थ भाजपाचे  ८ पैकी ३ नगरसेवक विरोधात होते. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या पारड्यात स्वपक्षाचे ५, मनसे-१ आणि भाजपामधील नाराज ३ असे ९ चे संख्याबळ मिळाले असते. याचा अर्थ १५ पैकी ९ मते घेवून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा बंडखोर उमेदवार निवडून आला असता. पण, अजित गव्हाणे यांचा अनुभव कमी पडला आणि फ-प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला संधीचे सोने करता आले नाही. विशेष म्हणजे, भाजपाचे तीनही नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. तरीही गव्हाणे अपयशी का ठरले? याचे चिंतन राष्ट्रवादीला करावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button