TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गावठाण जमिनीत गैरव्यवहार

बोईसर : बोईसरमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे ३५ गुंठे गावठाण जमिनीची विक्री करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच काही हेक्टर जागेचे परस्पर हस्तांतरण केल्याचे आढळून आले आहे. यामध्ये कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून बोईसर ग्रामपंचायत व दुय्यम निबंधक कार्यालय व इतर शासकीय विभागांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

बोईसर परिसरात गावठाण जागा नैसर्गिक विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. असे असतानाही बेकायदा विक्री सुरू आहे.   काही ठिकाणी कुटुंबाचा विस्तार सामावून घेणे अपेक्षित असताना त्यावेजी तीन-चार मजल्यांच्या इमारती उभारून त्यांची परस्पर विक्री करण्याचे प्रकार झाले आहेत. एका तक्रारदाराने माहितीच्या आधारे या प्रकारासंदर्भात माहिती मागविली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.  

विशेष म्हणजे सध्या बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या शर्यतीत असलेला  उमेदवार व त्याची पत्नी यांनी एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना ३५ गुंठे जमीन बोगस दाखल्याच्या आधारे विक्री केल्याचे उघडकीस आले आहे.

बोईसर ग्रामपंचायतीने सन २०१५-१६ च्या दरम्यान जारी केलेल्या या दाखल्यांवर असणारे आवक जावक क्रमांक बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या दाखल्यांच्या आधारे सन २०१७ मध्ये अनेक जागांची परस्पर विक्री  केल्याचेही दिसून येते. प्रत्यक्षात वन विभागाची ही जागा असताना व ग्रामपंचायतीला अशा प्रकारचे दाखले देण्याचे अधिकार नाहीत.  ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने  असे  प्रकार घडले आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर बोईसर ग्रामपंचायतीने दुय्यम निबंधकांना अशा दाखल्यांच्या आधारे नोंदणी करण्यात येऊ  नये असे लेखी सूचित केले होते. तरीही गैरप्रकार सुरू  आहेत. दुसरीकडे बोईसर ग्रामपंचायत अशा प्रकारांविरोधात पोलिसात तक्रार करण्यास सोयिस्कररीत्या टाळत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, बोईसर ग्रामपंचायत कार्यालयाच्या बनावट लेटरपॅड, शिक्के आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या बनावट सहीचा वापर करीत गावठण दाखले बनविण्यात आले आहेत. त्याद्वारे महसूल, वन आणि आदिवासींची जमीन बळकावून त्यावर इमारती व चाळींचे बांधकाम करणाऱ्या दांडीपाडा भागातील व्यक्तीचे नाव या प्रकरणात पुढे येत आहे, असे सांगितले जाते.

वन विभागाचे दुर्लक्ष

बोईसर परिसरात अनेक ठिकाणी राखीव वनक्षेत्र असून त्यावर राजरोसपणे अतिक्रमण झालेले आहे. असे असताना देखील वन विभागाने अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

बोईसर ग्रामपंचायत कार्यालयाकडून बनावट गावठण दाखले दिल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रांची निर्मिती केल्या प्रकरणात लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.  -सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button