पिंपरी / चिंचवड

एमआयडीसी भोसरी, देहूरोड, चाकण मध्ये तीन चो-या : सव्वाचार लाखांचा ऐवज चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

एमआयडीसी भोसरी, चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या तीन घटना घडल्या. एमआयडीसी भोसरी मधून 97 हजार 500 रुपयांचे कंपनीतील साहित्य, चाकण मधून दुचाकी आणि देहूरोड मधून एक टेम्पो चोरीला गेला आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 12) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अप्पासाहेब बाबुराव राजमाने (वय 63, रा. पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची राजमाने स्टेनलेस स्टील फिटिंग्स ही कंपनी आहे. 1 मार्च ते 4 मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. कंपनीमधील 97 हजरांचे लोखंडी साहित्य चोरटयांनी चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

संतोष नवनाथ खडप (वय 22, रा. कुरुळी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची एक लाख 10 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी त्यांच्या घराजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना 9 मार्च रोजी रात्री दहा ते 10 मार्च रोजी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

शशिकांत श्रीरंग परशुराम (वय 35, रा. शिंदेवस्ती रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा तीन लाख 20 हजार रुपये किमतीचा टेम्पो अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरजवळून चोरून नेला. ही घटना 11 मार्च रोजी रात्री अकरा ते 12 मार्च रोजी सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button