breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचे म्हाडाने टेंडर काढले

मुंबई – गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर या सर्वात मोठ्या वसाहतीच्या पुनर्विकासाचे ई-टेंडर अखेर म्हाडाने काढले आहे. सुमारे ६२ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या या ई-टेंडरसाठी खासगी कंपन्यांना १३ डिसेंबर २०२१ पर्यंत निविदा भरता येणार आहेत. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचा हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. तो ७ वर्षांत पूर्ण करण्याचे म्हाडाचे उद्दीष्ट आहे.

गोरेगाव पश्चिम येथे मोतीलाल नगर एक, दोन आणि तीन ही म्हाडाची मोठी वसाहत आहे. तेथे सुमारे ५ हजार ३०० घरे आहेत. या वसाहतीच्या पुनर्विकासाला विशेष बाब म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानंतर म्हाडाने मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी ई-टेंडर काढून खासगी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हाडाने ७ वर्षांची मुदत ठरवली आहे. त्यासाठी कंपन्यांना १३ डिसेंबरपर्यंत निविदा भरता येणार आहेत.

मोतीलाल नगरच्या तीन वसाहती सुमारे ५० हेक्टर जमिनीवर वसल्या आहेत. त्यांचा पुनर्विकास करणे म्हाडाला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे खासगी एजन्सी नेमून या वसाहतीचा पुनर्विकास करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरिता प्रति गाळा १,६०० चौरस फूट आणि बिगर निवासी वापराकरिता प्रति गाळा ९८७ चौरस फुटांचे बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने निविदा काढली आहे. ती भरताना संबंधित कंपनीला सोबत ५० कोटींचा डिमांड ड्राफ्ट हमी म्हणून सोबत जोडावा लागणार आहे. निविदा सूचनेनुसार नियुक्त केलेल्या कंत्राटदाराला मोतीलाल नगर एक ते तीनमधील घरे, झोपडपट्टी, विकास आराखड्यानुसार आरक्षणे, म्हाडाचा हिस्सा अशी विविध कामे ८४ महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागणार आहेत. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ पासून या पुनर्विकासासाठी खासगी कंपन्यांना टेंडर भारता येतील.

१३ डिसेंबर २०२१ ला दुपारी १ पर्यंत अंतिम मुदत आहे. या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी निविदा पूर्व बैठक म्हाडामध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. १४ डिसेंबरला निविदा उघडण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button