लाच स्वीकारताना वैधमापनशास्त्रचा निरीक्षक अटकेत

जामनेर तालुक्यातील पहूर येथे पेट्रोलपंपासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी सहा हजारांची मागणी करणार्या पाचोरा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या लाचखोर निरीक्षकाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत रंगेहाथ अटक केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली.
पहूर येथील एका पेट्रोलपंपधारकाला प्रमाणपत्र पाहिजे होते. यासंदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैधमापनशास्त्र विभागाकडे अर्ज केला. वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षक विवेक झरेकर (५४) याने लाचेची मागणी केली. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी निरीक्षक एस. के. बच्छाव, एन. एन. जाधव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सचिन चाटे आदींचे पथक तयार करून सापळा रचला. झरेकरने पहूर ते जळगावदरम्यान असणार्या हॉटेलमध्ये सहा हजार रुपये स्वीकारताच पथकाने अटक केली.