breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपातील भोसरी गटाचे राजकीय डावपेच महापौरांच्या पथ्यावर

  • अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा लागला असता

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरून भाजपाच्या चिंचवड आणि भोसरी गटामध्ये जोरदार रस्सीखेच झाली. अखेर स्थानिक पक्षश्रेष्ठींच्या राजकीय डावपेचानंतर हे पद भोसरीला गेल्यामुळे चिंचवड गटाच्या उषा उर्फ माई ढोरे यांचे महापौर पद सुरक्षित राहिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असली तरी त्यावर वर्चस्व गाजवणारे पक्षांतर्गत दोन गट सक्रिय आहेत. विधानसभानिहाय दोन गटात विभागलेल्या महापालिकेतील पदांची वाटणी देखील गटानुसार झालेली आहे. 2017 मध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षाचे स्थायी समिती सभापती पद सीमा सावळे यांच्याकडे होते. त्या भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रभागातून निवडून आल्या असल्या तरी त्या चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय म्हणूनच त्यांना संधी मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेविका ममता गायकवाड यांना संधी देण्यात आली. गायकवाड या आमदार जगताप यांच्या समर्थक मानल्या जातात. त्यानंतर 2019 मध्ये सभापती पद भाजपचे जुन्या गटाचे निष्ठावंत म्हणून विलास मडिगेरी यांना देण्यात आले. ते जुन्या गटाचे असले तरी आमदार जगतापांच्या नियुंत्रणाखालीच त्यांनी पदाचा कार्यभार सांभळला.

2020 मध्ये मात्र, सभापती पद भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटाचे संतोष लोंढे यांना देण्यात आले. संतोष लोंढे महापौर पदासाठी इच्छुक होते. त्यांना महापौर पद देणे शक्य न झाल्यामुळे आमदार लांडगे यांनी त्यांना सभापती पदावर काम करण्याची संधी दिली. त्यांचा कार्यकाळ नुकतास संपल्यानंतर 2021 या सरत्या वर्षातील सभापती पद चिंचवड की भोसरी गटाला मिळते, यावरून वादंग होते. आमदार जगतापांचे निकटवर्तीय शत्रुघ्न काटे हे सभापती पदासाठी तिव्र इच्छुक होते. त्यांना या पदावर संधी देण्याचा शब्द देखील जगतापांनी दिला होता, अशी कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती आहे. परंतु, सभापती पद आमदार लांडगे यांच्या गटातील नगरसेवक नितीन लांडगे यांना देण्यात आले. त्यामुळे शत्रुघ्न काटे यांचे सभापती होण्याचे स्वप्न भंगले. जर काटे यांना हे पद दिले असते तर महापौर माई ढोरे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यांच्या जागी भोसरीच्या नगरसेवकाला संधी द्यावी लागली असती.

कारण, दोन्ही पदे चिंचवड मतदार संघाकडे ठेवली असती तर भोसरीतील नगरसेवकांनी वाद घातला असता. त्यामुळे एक पद भोसरीला द्यावेच लागले असते. परंतु, आता स्थायीचे सभापती पदच भोसरीला गेल्यामुळे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यावरील पदाचा राजीनामा देण्याची वेळ टळली. त्यांना पुढील एक वर्षासाठी महापौर पदावर कायम ठेवण्यात येणार आहे. सभापती पद भोसरीला गेल्यामुळे ढोरे यांचे महापौर पद सुरक्षित राहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button