TOP Newsताज्या घडामोडीपुणे

मैत्रीच्या मोहापायी अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक

पुणे: समाजमाध्यमातील अनोळखी व्यक्तीशी झालेली मैत्री अंगलट येण्याच्या घटना वारंवार घडतात. छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे (सेक्सटाॅर्शन) प्रकार वाढीस लागले आहेत. समाजमाध्यमातील आभासी मैत्रीच्या मोहापायी अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात यंदा ऑक्टोबर महिना अखेरीपर्यंत सेक्सटाॅर्शनच्या १४४५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिना अखेरीपर्यंत सायबर पोलिसांकडे ६८५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याने दत्तवाडी भागातील एका तरुणाने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा सखोल तपास दत्तवाडी पोलिसांनी करून राजस्थानातील गुरुगोठिया गावातील एका तरुणाला अटक केली. तेव्हा गुरुगोठिया गावातील महिलाही अशा प्रकाराच्या गुन्ह्यात सामील झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.

खंडणी उकळणाऱ्या सायबर चोरट्यांच्या टोळ्या देशातील वेगवेगळ्या भागात सक्रिय आहेत. समाजमाध्यमात अनोळखी व्यक्तीशी झालेल्या मैत्रीमुळे अनेकांची फसवणूक झाली असून काही जण पोलिसांकडे तक्रारी दाखल करत नाहीत. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक चोरट्यांच्या जाळ्यात सापडतात. अनोळखी व्यक्तीने समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविल्यास दुर्लक्ष करावे. चोरट्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी केले आहे.

फसवणूक अशी केली जाते

अनोळखी व्यक्ती समाजमाध्यमातून संदेश पाठविते. ज्या खात्यातून संदेश पाठविला जातो, त्यावर तरुणीचे छायाचित्र असते. त्यामुळे तरुणीने मैत्रीची विनंती पाठविल्याचा समज तक्रारदारास होतो. त्यानंतर चोरटे तक्रारदाराला छायाचित्रे पाठविण्यास सांगतात. छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करून बदनामी करतो, अशी धमकी दिली जाते. बदनामीच्या भीतीपोटी तक्रारदार पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करतात.

घाबरू नये; पोलिसांकडे तक्रार करावी

सायबर चोरटे तक्रारदारास जाळ्यात ओढून त्याला छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत पाठविण्यास सांगतात. समाजमाध्यमातील व्हिडीओ काॅल मुद्रित करून त्याचा गैरवापर करण्याची धमकी दिली जाते. अशा वेळी तक्रारदाराने घाबरू नये. चोरट्यांच्या धमकीस न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तक्रारदारांसाठी हेल्पलाईन (क्रमांक-१९३०) सुरू केली आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी. चोरट्यांच्या धमकीकडे काणाडोळा करावा. संकेतस्थळ किंवा समाजमाध्यमावर एखादे छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळ किंवा समाजमाध्यमातील यंत्रणा (फिल्टर) अशा प्रकारची छायाचित्रे प्रसारित करत नाही, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button