ताज्या घडामोडीमुंबई

लाउडस्पीकरवरून मालवणीत तणाव; भाजप कार्यकर्त्यांसह ३५ जणांवर गुन्हा

मुंबई |मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राज्यात वातावरण तापले असतानाच मुंबईतील मालवणी भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नमाज पठणादरम्यान मशिदीसमोर लाउडस्पीकरवर गाणी लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांसह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची परवानगी नसताना रामनवमी निमित्त रविवारी मालवणी परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणूक मशिदीजवळ आली त्यावेळेस नमाज पठण सुरू होते. याचवेळी मिरवणुकीतील काही जणांनी मशिदीसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही जणांनी लाउडस्पीकरवर गाणी लावून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला. स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आयोजक तसेच भाजपचे काही स्थानिक नेते, कार्यकर्त्यासह ३० ते ३५ जणांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांना तीव्र आक्षेप घेतला होता. ‘मी धर्मांध नाही. कुणाच्याही प्रार्थनेला माझा विरोध नाही मात्र, मशिदींवर लावलेले भोंगे उतरवावेच लागतील’, असे सांगतानाच हे भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींच्या समोर दुप्पट क्षमतेच्या लाउडस्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे आवाहन राज यांनी केले होते. त्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. राज यांच्या पक्षातून एकीकडे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देत असताना दुसरीकडे राज यांच्या आवाहनानुसार अनेक ठिकाणी लाउडस्पीकर लावण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यात मुंबईत मालवणी येथे घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. या भागात मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button