TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

‘मलिकांचे डी-गँगशी संबंध’ मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण

मुंबई: आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं.

नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. तर डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे म्हणाले, ‘या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. या प्रकरणात नवाब मलिक यांनी जाणीवपूर्वक सहभागी असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यांवरून समोर आलं आहे‘.

२१ एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचंही पुढे आलं आहे.

ईडीने चार्टशीटमध्ये 17 लोकांचे जबाब नोंदवले

ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये 17 जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या जवळची होती आणि सलीम पटेल पारकरचा अंगरक्षक होता, असे शाहवली खानने आपल्या वक्तव्यात सांगितले. मालमत्तेबाबतचा प्रत्येक निर्णय हा हसीना पारकर यांच्या सूचनेनुसार पटेल यांनी घेतला, असंही सांगितलं.

दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना आरोपी बनवले असल्याची माहिती आहे. मालमत्तेचे सर्व कामकाज सरदार खानच्या माध्यमातून झाले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button