breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Mahavikasaghadi vs Bjp: …मग पंतप्रधान तरी कुठं पीपीई किट घालून फिरतायत; हसन मुश्रिफांचा भाजपावर पलटवार

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुहेरी पीपीई किट घालून घराबाहेर फिरून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टिकेला आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे पीपीई किट घालून फिरत आहेत. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, “करोनासारख्या वैश्विक महामारीशी उभा महाराष्ट्र जीवाचं रान करून लढत असताना भाजपावाले मात्र टाळ्या-थाळ्या वाजवा, काळे झेंडे दाखवा असे प्रकार करीत आहे. या कृतीतून ते महाराष्ट्राशी द्रोह करीत आहेत. करोनाशी संघर्ष करताना दोन-अडीच महिने प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, ग्रामदक्षता समित्या, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या योद्ध्यांचा भाजपा अपमान करीत आहे.”

करोना संसर्गाच्या लढाईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळाचे कामही कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राने प्रथम टाळेबंदीचे पाऊल उचलले. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन बरखास्त केले. त्यानंतर आठ दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन बरखास्त झालं. मध्य प्रदेशात सत्तालालासेच्या राजकारणापायी केलेल्या या खटाटोपात ३५ लाख लोक परदेशातून आल्याने संसर्ग वाढतच गेला. वेळेवरच टाळेबंदी जाहीर केली असती तर लोकांना घरात बसावे लागले नसते. भाजपाने आम्हाला सूचना, सहकार्य करायला हवे होते. परंतू, ते सातत्याने यावर राजकारणच करीत आहेत. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आता लोकांच्या डोळ्यासमोर आला आहे, अशी बोचरी टीकाही मुश्रीफ यांनी केली.

केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय

पीएम केअरमधून किती पैसे महाराष्ट्राला दिले गेले? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, “पीएम केअरला सगळे पैसे मुंबईमधून गेले तरी राज्य़ शासनाला केवळ ४०० कोटी दिले गेले. उत्तर प्रदेशला मात्र १५०० कोटी देण्यात आले, हा कुठला न्याय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पॅकेज म्हणून दिलेले २० लाख कोटी हे सगळं कर्जच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button