breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात- केशव उपाध्ये

मुंबई – राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर, बारावीच्या परीक्षेसंदर्भात येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर टांगती तलवार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही? या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा.”, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उपाध्ये म्हणाले, “कोरोना साथीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परिक्षांचे महत्त्व आहे की नाही? हा ही प्रश्न आहे.”

याचबरोबर “तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. जर राज्य सरकार परीक्षा घेणार नसेल, तर पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे? याबाबतची स्पष्टता अजुनही सरकारने केलेली नाही. परीक्षा न घेण्याचा पर्याय सरकार निवडणार असेल तर ज्या-ज्या ठिकाणी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातात त्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांचे काय? सरकारच्या या वेळखाऊ, धोरण लकव्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे याचे भान या सरकारने ठेवावे.” अशी देखील टीका यावेळी केशव उपाध्येंनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button