breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

#MaharashtraBand: राज्य सरकारचा हा बंद केंद्रातल्या भाजपासाठी धडा- नाना पटोले

मुंबई |

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या बंदबाबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“लखीमपूर खेरी येथील घटनेत ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत, ज्याच्यांवर नेपाळमध्ये तस्करी केल्याचे आरोप आहेत, अशा केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी कायद्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. घटनेनंतर आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले त्यांचे अपहरण करण्यात आले. कोणत्याही कोर्टासमोर त्यांना हजर न करता ज्या पद्धतीने एका महिलेला भाजपाच्या लोकांनी त्रास दिला ते लोकांनी पाहिले. आशिष मिश्राला अटक करुन न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. म्हणजेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्याच्यावर खूनाच्या गुन्ह्याखाली कारवाई व्हावी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना तातडीने मंत्रीमंडळातून काढण्यात यावे ही मागणी काँग्रेसच्या वतीने देशभरात केली जात आहे,” असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्र बंदचा नारा महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे देण्यात आला आहे. त्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे. नरेंद्र मोदींचे, भाजपाचे सरकार केंद्रात आल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना चिरडण्याचे काम सुरु झाले आहे. म्हणून व्यापारीही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. राज्य सरकारतर्फे होत असलेला हा बंद केंद्रात असणाऱ्या भाजपाच्या सरकारसाठी धडा आहे,” असे नाना पटोले म्हणाले. “राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीसंदर्भात आम्ही १५ हजार कोटी रुपये केंद्र सरकारला मागिलते होते. यामध्ये केंद्र सरकार आमच्यावर किंवा राज्याच्या शेतकऱ्यावर उपकार करत आहे हा भाग नाही. केंद्राने १५ हजार कोटींच्या ऐवजी १५०० कोटी रुपयांची घोषणा केली आहे ते अजूनही आलेले नाहीत. राज्याच्यावतीने राज्यसरकाने मंत्रीमंडळात शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील विजेचे १३ संच बंद आहेत. केंद्र सरकार मुद्दाम महाराष्ट्र काळोखात जावा यासाठी भाजपाच्यावतीने पाप सुरु झाले आहे. तरीसुद्धा राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

विजेच्या संकटाची परिस्थिती दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र याच राज्यांमध्ये निर्माण झाली आहे. हे सगळे भाजपाविरोधी राज्ये आहेत म्हणून याप्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असेही नाना पटोलेंनी म्हटले आहे. “भाजपा दबातंत्र मान्य करणार नाही असे म्हणत आहे. आज केंद्रातील आणि मागच्या काळातील फडणवीसांचे सरकार यांनी दबाव तंत्राचाच वापर केला आहे. आजही त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय लावतायत. महाविकास आघाडीच्या सरकारला संवेदना आहेत म्हणून सरकार शेतकऱ्याला नेहमी मदत करत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने कितीही सांगितली तरी त्यांची टक्केवारी कमी झाली आहे, असे नाना म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button