शिवाजी पार्कमध्ये तरुणाचं झाडावर चढून आंदोलन, कारण काय?

मुंबई | मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात एका चित्रपट निर्मात्याने झाडावर चढून अनोखं आंदोलन केलं. तसेच आत्महत्येची धमकी दिली. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रविणकुमार मोहरे यांनी केलेल्या या आंदोलनामुळे मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात खळबळ उडाली होती. या ठिकाणी काहीवेळ हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यानंतर अग्निशामनदल दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी प्रविणकुमार मोहरे यांना झाडारून खाली उतरवलं. त्यानंतर आता त्यांच्या अडचणीसंदर्भात चर्चा करण्यात येत आहे.
दिग्दर्शक प्रविणकुमार मोहरे म्हणाले, चित्रपटामध्ये काही प्राण्यांचे चित्र दाखवले जातात. त्यासाठी अॅनिमल वेलफेअर बोर्ड एनओसीच्या नावावर ३० हजार रुपये घेतं. त्यामुळे हे पैसे घेऊ नयेत. हा एक प्रकारचा भ्रष्ट्राचार आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे येत आहेत. मी एक मराठी चित्रपट बनवला आहे. मात्र, तो चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे येत आहेत. याचं कारण असं आहे चित्रपट सेन्सार बोर्डाला लावलेले नियम आणि अटी. चित्रपटात समजा एखादी कोंबडी दाखवली तरी त्या एका सीनसाठी ३० हजार रुपये भरा आणि त्यानंतर हा सीन पास करा, असा प्रकार सुरु आहे.
हेही वाचा – Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून ३ दिवस ब्लॉक
चित्रपटात एक बैलगाडी दाखवली तर आधी ३० हजार भरा आणि त्यानंतर सीन पास करा, असा प्रकार सुरु आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना ब्लॅकमेल केलं जात आहे. ३० हजार रुपये घेऊन अॅनिमल वेलफेअर बोर्ड कोणता नियम पाळतं? जर आम्ही चित्रपटात संस्कृती दाखवली तरीही ते प्राण्यांवरील अन्याय होतो का? मग आम्ही चित्रपट कसे बनवायचे? असं प्रविणकुमार मोहरे म्हणाले.