महिला दिनानिमित्त राज्यभरात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार; महिला आयोगाने घेतला पुढाकार

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचयातींमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहे. या विशेष ग्राम सभेतून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचा ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या विशेष सभेची मागणी केली होती. महिला आयोगाच्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिनांक 6 मार्च रोजी पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा- शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा खासदाराला अटक का नाही? राऊतांचा संतप्त सवाल
चाकणकर म्हणाल्या, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रूढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागत आहे. या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होऊ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे.
पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, संपूर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांची वागणूक देत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अशा प्रयत्नांमधून बदलेल म्हणून आयोगाने अशी संकल्पना मांडली आहे.