नागपूर हिंसाचार प्रकरण! 5 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णत हटवली, नागपूर पोलिस आयुक्तांनी दिले निर्देश

नागपूर : नागपूरमध्ये पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली. तर गणेशपेठ, तहसील, कोतवाली या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंशतः संचारबंदी कायम आहे. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. रात्री 10 नंतर या हद्दीत संचार बंदी कायम असणार आहे. तसेच यशोधरा नगर इथं देखील संचार बंदी कायम आहे. नागपूर पोलिस आयुक्तांनी याबाबतचे निर्देश काढले आहेत.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे. शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या शहरात कधी नव्हे ते ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळल्याची घटना घडली असून सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणाव पूर्ण शांततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
हेही वाचा – सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लिनचीट, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे. मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिस प्रशासन सतर्क झालं होतं. नागपूरच्या विविध भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसत आहे.