Mumbai-Pune Expressway । ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर खंडाळा घाटात वाहतूक कोंडी!
वाहनांच्या ८ ते १० किलोमीटर लांब रांगा : महामार्गावर बर्निंग कारचा थरार
लोणावळा । मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात शनिवारी पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली होती. मार्गावर वाहनांच्या ८ ते १० किलोमीटर लांब दुतर्फा रांगा लागल्या होत्या. हि वाहतूक कोंडी सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका चालत्या रेनॉल्ट कारने पेट घेतला आणि लागलेल्या आगीत जळून खाक झाली. या घटनेमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. सुदैवाने कारच्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवार व रविवारच्या विकेंडच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या वाहनांतून लोणावळा खंडाळा व मावळातील पर्यटनस्थळांसह महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, सांगली व सातारातील विविध पर्यटन स्थळांकडे हिवाळी पर्यटनासाठी जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी पहाटेपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी पहाटेपासून झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही महामार्गाचे पोलिस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते.
१० मिनिटांचा ब्लॉक घेत वाहतूक कोंडीवर नियंत्रण!
वाहतूक कोंडीत भर होऊ नये यासाठी दोन्ही महामार्ग पोलिसांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी बोरघाट महामार्ग पोलिस चौकी जवळील छेद मार्गावरुन वाहतूक पुणे मुंबई लेनवरून (मार्गिका) पुढे खंडाळा बोगद्याच्या पुढे असलेल्या छेद मार्गावर मुंबई पुणे लेनवरून (मार्गिका) पुढे पुण्याकडे रवाना करण्यात आली. १० मिनिटांचा ब्लॉक घेत वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला.
चालती रेनॉल्ट कार आगीत जळून खाक
वाहतूक कोंडी सुरळीत होण्याच्या मार्गावर असताना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका चालत्या रेनॉल्ट कारने अमृत अंजन पुल व बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिस ठाण्या दरम्यान अचानक पेट घेतला. आणि वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. आग लागल्याचे समजताच कार चालकाने प्रसंगावधान राखत कार मार्गाच्या साईडला घेऊन उभी करत कार चालक आणि कारमधील प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अवघ्या काही क्षणातच कारला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच तेथेच जवळ असलेल्या महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी आयआरबी कंपनीच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. तत्पूर्वी त्या ठिकाणी देवदूत आपत्कालीन पथक दाखल झाले आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र आज वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीवर नियंत्रण ठेवणे अवघड होत होते. लागलेल्या आगीत संपूर्ण रेनॉल्ट कार जळून भस्मसात झाली. आग विझविल्या नंतर महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त जळीत कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.





