वडार समाजाला राजकारणात प्रतिनिधित्व मिळावे; आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन

पुणे | महाराष्ट्रातील वडार समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक पुण्यातील मजूर फेडरेशन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर तसेच वडार समाजाचे राष्ट्रीय नेते संजीव कुसाळकर हे उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, “वडार समाजातील व्यक्तींना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजातील युवकांनी आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या वडार समाजाने प्रगती साधली पाहिजे.”

कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन मुकुंदराव पवार व मनोहर मुधोळकर यांनी केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे दहा-दहा प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. कार्यक्रमात गणेश सातपुते, वसंतराव गुंजाळ (धुळे), मनोहर मुदळकर (सोलापूर), रमेश जेठे (अहिल्यानगर), रमेश शिंदे (पुणे), महादेव मंजुळकर (नांदेड), भारत रॅपनवाड (नांदेड) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत समाज संघटन, युवकांचे सक्षमीकरण, शैक्षणिक प्रगती व राजकीय हक्क या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
“वडार समाजाला केवळ सामाजिक नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही हक्काचं स्थान मिळायलाच हवं. युवकांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि नेतृत्वात पुढे येऊन समाजाच्या प्रगतीचा मार्ग खुला केला पाहिजे.”
– प्रवीण दरेकर, आमदार, भाजपा.




