ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा हल्ला

खासदार संभाजीराजे छत्रपतींवर जितेंद्र आव्हाडानी केलेल्या टीकेवरुन हल्ला

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रसत्त्यात हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली होती. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबईत पी डिमिलो रोड येथे ही घटना घडली आहे.

स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हणताना दिसतोय. “युवराज छत्रपतीराजे यांचं रक्त तपासावं लागेल की ते छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारचं छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं, जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास, ही सर्वात मोठी बात महाराष्ट्राला समजली आहे की, तू पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला नेमका कसा केला?
जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली होती. याच गोष्टीचा फायदा घेत स्वराज्य संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी त्यांच्या गाडीच्या अगदी पाठीमागे होती. पण त्याची पर्वा न करता आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर लाकडी दंडूकांनी हल्ला केला. त्यांनी आव्हाड यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.

जितेंद्र आव्हाड यांनी काय वक्तव्य केलं होतं?
“संभाजीराजेंना छत्रपती हे म्हणणं सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असं वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button