शेतकऱ्यांसाठी खुशखबर: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून दरमहा 3000₹ मिळणार पेन्शन

नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे, त्यापैकी पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच आता पीएम किसान मानधन पेन्शन योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेत नोंदणीकृत असाल, तर कोणत्याही कागदपत्रांच्या झंझटीशिवाय तुम्ही पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकता. विशेष म्हणजे, या योजनेसाठी लागणारे मासिक योगदानही तुमच्या खिशातून न जाता पीएम किसानच्या निधीतून आपोआप कापले जाईल.
पीएम किसान मानधन योजना ही छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. या योजनेत 18 ते 40 वयादरम्यान नोंदणी करता येते. शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागते. वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल, म्हणजेच वर्षाला 36,000 रुपये. ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.
जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर पेन्शन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेत नोंदणीवेळीच तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे सरकारकडे जमा झालेली असतात. शिवाय, पेन्शन योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतून कापले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. अधिक माहितीसाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर भेट द्यावी.
हेही वाचा – ‘गडकोट किल्ल्यांचा वारसा जपणे सर्वांची जबाबदारी’; आनंद देशपांडे
पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत 6,000 रुपये मिळतात. पेन्शन योजनेसाठी कमीत कमी 660 रुपये (55 रुपये मासिक) आणि जास्तीत जास्त 2,400 रुपये (200 रुपये मासिक) योगदान लागते. समजा, जास्तीत जास्त 2,400 रुपये कापले गेले, तरी सन्मान निधीतील 3,600 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात शिल्लक राहतील. वयाच्या 60 नंतर, शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन आणि सन्मान निधीचे 6,000 रुपये मिळतील, म्हणजेच वर्षाला एकूण 42,000 रुपयांचा लाभ होईल.
ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपी आणि फायदेशीर आहे. कागदपत्रांच्या झंझटीशिवाय आणि अतिरिक्त खर्चाशिवाय पेन्शनचा लाभ मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे.