‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची धडक कारवाई; महाराष्ट्रातून आणखी दोन आरोपी जेरबंद

NEET UG Paper Leak CBI Arrest | देशभर खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) बुधवारी महाराष्ट्रात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सीबीआयने या परीक्षा घोटाळ्यात थेट सहभागी असलेल्या आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये लातूरमधील एका नामांकित डॉक्टरचा आणि पुण्यातील एका नामांकित कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा समावेश आहे. या दोन नव्या अटकेमुळे या हायप्रोफाईल घोटाळ्यातील एकूण आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.
तपासाच्या सुरुवातीला सीबीआय डॉ. मनोज शिरुरे याला या प्रकरणात सरकारी साक्षीदार (माहिती देणारा) बनवण्याच्या विचारात होती. मात्र, कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आणि या संपूर्ण गुन्ह्यात त्याचा थेट व सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर सीबीआयने त्याला थेट अटक करण्याचा निर्णय घेतला. डॉ. शिरुरे याने हा पेपर आधीच अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडून मिळवला होता. कुलकर्णी हा पुण्याचा निवृत्त केमिस्ट्री शिक्षक असून त्याचे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) सोबत थेट संबंध होते.
लातूरच्या डॉक्टरचे ‘केमिस्ट्री’ कनेक्शन
सीबीआयच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला लातूरचा प्रसिद्ध फिजीशियन डॉ. मनोज शिरुरे याने तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचा (रसायनशास्त्र) फुटलेला पेपर आधीच मिळवून दिला होता. विशेष म्हणजे, या तीन विद्यार्थ्यांमध्ये लातूरमधीलच एका मोठ्या कोचिंग क्लास चालकाच्या मुलाचाही समावेश आहे.
पुण्यातून फिजिक्सचा शिक्षक जेरबंद
याच कारवाईदरम्यान सीबीआयने पुण्यातूनही एका शिक्षकाला अटक केली आहे. पुण्यातील ‘APMA’ (डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी) या कोचिंग क्लासमधील फिजिक्सचा (भौतिकशास्त्र) शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह याला जेरबंद करण्यात आले आहे. तेजस शाह याच्यावर फिजिक्सचा फुटलेला पेपर विद्यार्थ्यांना वाटल्याचा गंभीर आरोप आहे. आधीच अटक झालेल्या मनीषा हवालदार नावाच्या शिक्षिकेकडून तेजसने हा पेपर घेतला होता आणि तो आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना पुरवला होता.
हेही वाचा
आसाराम बापूला सर्वोच्च झटका! बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा कायम
असा रचला गेला होता पेपर लीकचा कट:
परीक्षा मंडळाशी संबंधित असलेल्या काही शिक्षकांनी संगनमत करून हे मोठे रॅकेट चालवले होते, ज्यामध्ये विषयानुसार जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या होत्या:
- मनीषा हवालदार: फिजिक्सचा (भौतिकशास्त्र) मूळ पेपर लीक केला.
- पी. व्ही. कुलकर्णी: केमिस्ट्रीचा पेपर लीक केला आणि त्याचे मराठीत भाषांतर (ट्रान्सलेशन) केले.
- मनीषा मंधारे: बॉटनी आणि झूलॉजी (जीवशास्त्र) या विषयांचे पेपर लीक करून त्यांचे मराठीत भाषांतर केले.
देशभरात ४९ ठिकाणी सीबीआयचे छापे
या आंतरराज्यीय घोटाळ्याचे मूळ शोधण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत देशभरात तब्बल ४९ ठिकाणी मोठे छापे मारले आहेत. या कारवाईत संशयितांकडून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. हे रॅकेट नक्की कुठपर्यंत पसरले आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, हे शोधण्यासाठी जप्त केलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे नामांकित कोचिंग क्लासेस आणि परीक्षा घेणाऱ्या अधिकृत यंत्रणेमधील मोठे साटेलोटे (रॅकेट) उघडकीस आले असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.





