भाई तुरूंगात, वाढदिवस मात्र पुण्याच्या रस्त्यावर; पोलिसांनी काढली धिंड
![Bhai in jail, birthday but on the streets of Pune; Police action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Pune-Crime-780x470.jpg)
पुणे | रस्त्यावर गर्दी करून वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार वाढला आहे. अनेक तरूण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करताना दिसतात. मात्र, पुण्यात एक निराळाच प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या येरवडा तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीचा वाढदिवस तरूणांनी रस्ता अडवून साजरा केला. दरम्यान, पोलिसांनी या तरूणांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनवाडी परिसरात रात्री बारा वाजता काही तरुण वाढदिवस साजरा करत होते आणि वाढदिवस ज्याचा होता तो मात्र तुरुंगात होता. मोक्काच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र या तरुणांनी “भाईंचा” वाढदिवस साजरा केला. वाढदिवसासाठी आणलेला केकही खास होता. येरवडा जेलची प्रतिकृती आलेला केक या मुलांनी आणला होता. त्यावर होता भाईचा फोटो आणि येरवडा कारागृहाचा फोटो.
हेही वाचा – अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर..
रस्ता अडवून, दुचाक्या उभ्या करून, तुरुंगात असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा झाला आणि केक या पोरांनी तलवारीने कापला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहोचला आणि आता पोलिसांनी या सगळ्या तरुणांना अटक केली असून जिथे केक कापला तिथूनच त्यांची धिंड काढली आहे.