सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
सोलापूर |
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी दुपारी जि. प. प्राथमिक कन्नड शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्यावरील कथित अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तत्काळ धाव घेऊ न त्या मुख्याध्यापकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. महांतेश हणमंतराव कट्टीमनी (वय ५५, रा. अक्कलकोट) असे संबंधित मुख्याध्यापकाचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते यापूर्वी नागणसूर येथे जि. प. कन्नड शाळेत मुख्याध्यापकपदी सेवेत होते. त्यांच्या पत्नीही याच शाळेत सहशिक्षिका आहेत. या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आपण वाढविली असून शिष्यवृत्ती परीक्षेतही सर्वाधिक मुले याच शाळेतून चमकली आहेत.
एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थी मुलांना आपण तीनवेळा मोफत विमानाने हवाई सफर घडवून आणली होती. अशा प्रकारे विविध उपक्रम राबवित असताना आपल्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. त्यावर चौकशी होऊ न त्यात आपणांवर कोणताही ठपका लागला नाही. परंतु तरीही गेल्या दोन वर्षांपासून आणखी वेगवेगळ्या चौकशांचा ससेमिरा सुरूच आहे. यातच आपली ५४ किलोमीटर दूर अंतरावर तडवळ येथील शाळेत अन्यायाने बदली करण्यात आली. ही बदली रद्द करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या स्वीय सहायकाने आपणांकडून एक लाखाची रक्कम उकळली. परंतु बदली रद्द झाली नाही, उलट आपल्या पाच महिन्यांच्या रजेच्या कालावधीतील वेतन जाणीवपूर्वक थांबविण्यात आल्याचे कट्टीमनी यांचे म्हणणे आहे.





