आणखी एक धक्का ! ‘या’ दांपत्याचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : येत्या काही दिवसांत महापालिकेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिकेच्या सत्तेतून ठाकरेंना पायउतार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपने जोर लावला आहे. यादरम्यान ठाकरेंना एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेवक संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
आज मुंबईत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय घाडी आणि संजना घाडी यांचा पक्षप्रवेश पार पडला. संजय घाडी आणि संजना घाडी हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे बोरिवली-मागाठाणे परिसरातील महत्वाचे चेहरे होते. मात्र आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन सोडत थेट एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दोघेही पती पत्नी हे मुंबई महापालिकेत नगरसेवक राहीले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते, माजी नगरसेवक राहिले होते. त्यात घाडी दाम्पत्याचा समावेश होता. शिंदे गटाविरोधात या दोघांनी आक्रमक भूमिका मांडत विविध मुद्यांवर आंदोलन केले होते. मात्र आता त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा – “मराठी खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन…” मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुन्हा मनसे आक्रमक, बॅनरने वेधलं लक्ष
बोरिवली-मागाठाणे हा उत्तर मुंबईतील भाग ठाकर गटासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. या भागात भाजप आणि शिंदे गटाचे चांगले वर्चस्व आहे. अशातच आता संजय घाडी आणि संजना घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटासमोर या भागात मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
मागील काही महिन्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर धक्के बसले आहेत. अनेक मोठ्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे एकीकडे नेते आणि पदाधिकारी सोडून जात असताना मुंबई महापालिका वाचवणे ठाकरेंसाठी अधिक आव्हानात्मक होताना दिसत आहे.