शिवनेरी, शिवशाहीनंतर लालपरीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस! परिवहन मंत्र्यांची घोषणा…

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या बस दाखल होणार आहेत. गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब आहेत. या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे. अर्थात, एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसगाड्यांना गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सध्याच्या बसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी असताना, नव्या बसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गावर उभे राहणाऱ्या तब्बल १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होईल. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गावर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
हेही वाचा – पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘राणी हिराई उमेद मार्ट’चे उद्घाटन
या नवीन बस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे चालते-बोलते प्रतीक ठरतील, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. लवकरच इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या बस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.




