समुद्रातील हरित उद्यान संकटात
भरावामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याच्या भीतीने कोळी बांधवांचा विरोध
मुंबई : मुंबईतील पर्यावरणाचे ढासळणारे संतुलन सावरण्यासाठी कफ परेड परिसरात समुद्रात भराव घालून हरित उद्यान उभारण्याच्या पालिकेच्या स्वप्नाला स्थानिक कोळी बांधवांनी सुरुंग लावला आहे. जैवविविधता धोक्यात येऊन उपासमार होण्याची भीती कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे. उद्यानासाठीच्या चाचण्याही त्यांनी बंद पाडल्या आहेत. तिढा सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
मुंबईमध्ये सध्या मेट्रो प्रकल्पांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. लवकरच सागरी किनारा मार्गाच्या उभारणीचे कामही सुरू करण्यात येणार आहे. विकास प्रकल्प आणि इमारतींचे पुनर्विकास यामुळे मुंबईमधील वृक्षसंपदा कमी होऊ लागली आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याच्या भीतीपोटी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कफ परेड येथील गीतानगर ते एनसीपीए परिसरालगत समुद्रामध्ये भराव टाकून ३०० एकर जमीन निर्माण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या भरावभूमीवर केवळ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी काही चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र स्थानिक कोळी बांधवांनी या हरित उद्यानालाच विरोध करत काम बंद पाडले. या भरावभूमीमुळे समुद्रातील जैवविविधतेवर गदा येईल. परिणामी, मासेमारी व्यवसाय धोक्यात येऊन कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येईल, असा आक्षेप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी घेतला आहे.
कफ परेड परिसरात १९७१-७२ मध्ये भराव टाकण्यात आला होता. त्यावेळी कोळी बांधवांनी कडाडून विरोध केला होता. त्यावेळच्या सरकारने भविष्यात समुद्रात भराव टाकण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. तसेच १९८० मध्ये समुद्रात भराव न टाकण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. तरीही आता हरित उद्यानाचा घाट घालण्यात आला आहे.
मुळात या परिसरचे नियोजन प्राधिकरण महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आहे. असे असताना या भागात पालिका कशी काय हस्तक्षेप करू शकते, असा मुद्दा तांडेल यांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएच्या २००० सालच्या विकास आराखडय़ात हा भाग समुद्र म्हणून दाखवला आहे.
पण पालिकेने मात्र त्यावर हरित उद्यानाचे आरक्षण टाकले आहे. याचा खुलासा पालिका करण्यास तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. ग्रीन पार्कजवळ २०० बोटी नांगरून ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पण भविष्यात बोटी वाढल्या तर त्या कुठे उभ्या करायच्या, माशांच्या प्रजोत्पादनाच्या जागा नष्ट होतील असे मुद्दे कोळ्यांनी उपस्थित केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेने कंत्राटदारामार्फत काही चाचण्या घेऊन ग्रीन पार्कच्या कामाचा श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक कोळी बांधवांनी हे काम बंद पाडले. कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकही आयोजित केली होती.
मात्र कोणत्याही परिस्थितीत हरित उद्यान होऊ देणार नाही, असा निर्धार कोळी बांधवांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रश्नी वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
विरोधाची कारणे..
’ हरित उद्यानाच्या नियोजित जागेत मासेमारी बोटी उभ्या करण्यात येतात. उद्यान साकारल्यानंतर कोळ्यांना त्यांच्या बोटी नांगरून ठेवण्यासाठी जागा कमी पडेल.
’ शिवस्मारकामुळे माशांच्या प्रजोत्पादनाच्या जागा धोक्यात आल्या आहेत. गीतानगर ते एनसीपीएदरम्यान समुद्रामध्ये विविध सागरी जीवांच्या प्रजोत्पादनाच्या जागा आहेत. हरित उद्यान उभारल्यास या जागा नष्ट होतील.
कोळी बांधवांनी हरित उद्यानासंदर्भात उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पालिकेत वरिष्ठ पातळीवर बैठक घेण्यात येणार आहे.
-किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय