सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ ? – खा. सुप्रिया सुळे
अहमदनगर– आज अहमदनगर येथे महिला मेळाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील आणि देशाची परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कुपोषणामुळे मुलांचे मृत्यु होत आहेत, महागाई प्रचंड वाढली आहे या सगळ्याबाबत लोकांचा संताप अनावर होत आहे. लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही दौरा आखला आहे. अजित पवार काही भागात फिरतील, प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील काही भागात फिरतील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काही भागात फिरतील आणि मी काही भागात फिरून सत्य परिस्थिती काय आहे याचा अभ्यास करणार आहोत, अशी माहिती यावेळी सुळे यांनी दिली. संवाद दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
सेल्फी विथ पॉटहोल ही मोहीम आम्ही सुरू केली आहे. लोकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र सरकार लक्ष देत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री राज्याची धुरा सांभाळतात त्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे. मुख्यमंत्री विरोधी बाकावर असताना आरोप करायचे सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करायचे आज एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मग आता कोणावर ३०२चा गुन्हा दाखल करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीत शेतकरी आंदोलन करणार होते हे सगळ्यांना माहिती होते. ते शांतपणे आंदोलन करणार होते मग पोलिसांचा उपयोग करून लाठीचार्ज का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी विचारला. या सरकारविरोधात कोणी बोलले तर दबावाचा उपयोग करून आवाज दाबला जातो, अशी ही टीका त्यांनी केली. सत्तेत असलेले आमदार अपहरणाची भाषा करतात, मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ असे चित्र आज निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
पेट्रोल-डिझेलवरील कर सरकारने कमी केला तर आत्ता २५ रुपयांनी भाव कमी होतील पण या सरकारला महागाई कमीच करायची नाही. गरीब माणसाचा गळा घोटण्याचे काम या सरकारला करायचे आहे. काल शेतकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज या सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.