श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, सातारकरांवर दु:खाचा डोंगर

- उदयनराजे भोसले यांचे काका शिवाजीराजे भोसले यांचं निधन,
- उदयनराजे यांच्या काकांचं निधन
- शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यात निधन
- साताऱ्यात उद्या अंत्यसंस्कार
पुणे । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।
साताऱ्याच्या राजघराण्यातील शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका होते. शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचं नगराध्यक्षपद देखील भूषवलं होतं. सातारा जिल्ह्यात ज्यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले त्यावेळी राजघराण्यातील वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळं सातारा राजघराणे आणि सातारकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उदयनराजे भोसले यांचे चुलते छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन झालं आहे. पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी ५.४५ वाजता प्राणज्योत मालवली. शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणला जाणार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे भोसले यांनी अनेक वेळा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन केले होते.
शिवाजीराजे भोसले यांची कारकीर्द
साताऱ्याच्या राजघराण्यातील पुण्यशील सुमित्राराजे भोसले आणि शाहू महाराज यांना प्रतापसिंह, अभयसिंह, विजयसिंह आणि शिवाजीराजे अशी चार मुलं, शिवाजीराजे भोसले हे सर्वात लहान होते. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला होता. शिवाजीराजे भोसले यांनी सातारा शहराचे नगराध्यक्ष म्हणून 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत काम केलं. याकाळात त्यांनी सातारा शहराच्या विकासासाठी विविध विकासकामं केली.