विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

मुंबई – राज्यातील विधानपरिषदेच्या औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक मतदारसंघ या पाचही जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आज मतमोजणी होत आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने ताकद पणाला लावली होती. दरम्यान, जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. परंतु १ डिसेंबर रोजी कोरोना सावटाखालीच या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड, तर भाजपाकडून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवारदेखील या रिंगणात उतरले आहेत. तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपा पुरस्कृत जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत.
औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सतिश चव्हाण यांची ही सलग तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात खरी लढत आहे.
नागपूर मतदारसंघात 322 मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पदवीधर मतदारसंघात भाजपाचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजपाने विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसकडूनही नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना संधी देण्यात आली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून नितीन धांडे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, भाजपा नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदेही मैदानात असल्याने भाजपा उमेदवारासमोरील डोकेदुखी वाढली आहे.